जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे ३८ व्या अंडर ११ राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन

by Vivek Sohani - 04/08/2025

दि.२ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान स्वीग लीग मध्ये खेळविण्यात येणाऱ्या ११ वर्षाखालील मुलं-मुलींच्या या बुद्धिबळ महासंग्रामाचे उद्घाटन रक्षा खडसे व स्मिता वाघ यांनी बुद्धिबळाच्या पटावर मोहरा चालवून (सेरीमोनियल मूव्ह) केली. सुरवातीला मान्यवरांच्या उपस्थित दीपप्रज्वलन झाले. चिमुकला वल्लभ अमोल कुलकर्णी सोबत रक्षा खडसे यांनी बुद्धिबळ पटावर मोहरांच्या चाली खेळल्यात. यानंतर महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभाला केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, पंच देवाशीस बरुआ, अतुल जैन, अशोक जैन, सिद्धार्थ मयूर, निरंजन गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.

पाच वर्षाचा वल्लभ कुलकर्णी, आशियाई विजेता अद्विक अग्रवाल यांच्यासह ५३२ खेळाडूंचा सहभाग

दीपप्रज्ज्वलन करून स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाची सुरुवात करण्यात आली.

जळगाव दि. ०१ प्रतिनिधी - सध्याच्या स्पर्धेच्या युगात पाल्यांमध्ये ताणतणाव निर्माण होत असतो. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व आरोग्यदृष्ट्या खूप महत्त्वाचे म्हणजे कुठलाही खेळ होय. बुद्धिबळ सारख्या खेळात जगात दिव्या देशमुख च्या यशामुळे महाराष्ट्राची शान वाढली आहे. त्यामुळे जग भारताच्या बुद्धिमत्तेला सलाम करत आहे. मुलांनी खेळ छंद म्हणून जोपासण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यासाठी शासनस्तरावर सुद्धा स्पोर्टस पॉलिसी निर्माण केली जात असल्याचे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले.

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आपले मनोगत व्यक्त करताना

जळगाव जैन हिल्सच्या भव्य अनुभूती मंडपममध्ये ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे बोलत होत्या. याप्रसंगी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर खासदार स्मिता वाघ, जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले, जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे व जैन स्पोर्टस अकॅडेमीचे अध्यक्ष अतुल जैन, कोलकता येथील आंतरराष्ट्रीय पंच देवाशीष बरूआ उपस्थीत होते.

३८ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे सेरीमोरियल चाल खेळून उद्घाटन करतान केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, पंच देवाशीस बरुआ, अतुल जैन, अशोक जैन, सिद्धार्थ मयूर, निरंजन गोडबोले.

दि.२ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान स्वीग लीग मध्ये खेळविण्यात येणाऱ्या ११ वर्षाखालील मुलं-मुलींच्या या बुद्धिबळ महासंग्रामाचे उद्घाटन रक्षा खडसे व स्मिता वाघ यांनी बुद्धिबळाच्या पटावर मोहरा चालवून (सेरीमोनियल मूव्ह) केली. सुरवातीला मान्यवरांच्या उपस्थित दीपप्रज्वलन झाले. चिमुकला वल्लभ अमोल कुलकर्णी सोबत रक्षा खडसे यांनी बुद्धिबळ पटावर मोहरांच्या चाली खेळल्यात. यानंतर महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.

पुढे बोलताना रक्षा खडसे म्हणाल्यात की, खेळ आयुष्याचा महत्त्वाचा भाग ठरत आहे. विद्यार्थ्यांमध्ये ताण तणाव वाढत आहे. बुद्धिबळ खेळामुळे समूह व्यवस्थापन व वेळेचे नियोजन सुयोग्य करता येते परंतू शारिरीक दृष्ट्या देखील खेळाचे महत्त्व जीवनात आहेच. आयुष्यात खेळ नसेल तर बऱ्याच गोष्ट आपल्या हातून निसटून जात असतात. स्पर्धेत हार व जीत हे खेडाळूवृत्तीने स्वीकारता येते. खेळामध्ये भारताची प्रगती विलक्षण होत आहे. प्रत्येक घरांपर्यंत, प्रत्येक मुलांपर्यंत खेळ पोहचवून ऑलिम्पिकमध्ये स्थान कसे वाढेल यासाठी विशेष स्पोर्टस पॉलिसी तयार केली जात आहे. येणाऱ्या क्रीडा दिनी तीन दिवसीय प्रोत्साहनपर विविध क्रीडा विषयी उपक्रम घेतले जाणार असल्याचे सुतवाच त्यांनी यावेळी केले.

जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी प्रास्ताविकातून देशभरातील खेळाडूंचे स्वागत केले. भारताचे बुद्धिबळामध्ये उत्तम भवितव्य आहे. दिव्या देशमुख व कोनेरु हम्पी यांच्या यशामुळे या खेळामध्ये चैतन्य निर्माण झाले. दिव्या ही २०२२ मध्ये जळगावात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली होती याची आठवण त्यांनी सांगितली.

खासदार स्मिता वाघ आपले मनोगत व्यक्त करताना

खासदार स्मिता वाघ यांनी २८ राज्यांतून जैन हिल्सच्या निसर्गरम्य ठिकाणी आपल्या पालकांसह आलेल्या खेळाडूंचे स्वागत करुन खेळासाठी शुभेच्छा दिल्यात. काही तरी शिकून जाऊ किंवा जिंकून जाऊ सोबत जळगावच्या आठवणी घेऊन जाऊ असे त्यांनी म्हटले. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर यांनी महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनची स्पर्धेच्या आयोजनाबाबतची भुमिका मांडली. स्पर्धेत लिंग भेद न मानता मुलं-मुलींना समान पारितोषिके दिली जाणार आहेत, सोबतच जळगावमध्ये विशेष पॅटर्न म्हणून विजयी, पराजित व बरोबरीत खेळणाऱ्यांसुद्धा त्यांच्या मुल्यांकनानुसार पारितोषिक दिले जाणार आहे.

जागतिक मानांकन प्राप्त खेळाडूंचा सहभाग

जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे ३८ व्या अंडर ११ राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत उपस्थित खेळाडू

छत्रपती संभाजीनगर येथील पाच वर्षाचा वल्लभ अमोल कुलकर्णी तसेच आठ वर्षाखालील आशियाई विजेता अद्वित अग्रवाल, १० वर्षाखालील पश्चिम बंगाल मधील विश्वविजेता मनिष शरबातो, ७ वर्षाखालील जागतीक स्कूल गेम विजेती प्रणिता वकालक्ष्मी यासह युएई, अबुधाबी, जर्मनी, मलेशिया येथील भारतीय वंशाचे १४ खेळाडूंसह ५३८ खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग आहे.

आंतरराष्ट्रीय मुख्य पंच देवाशिस बरुआ (पश्चिम बंगाल) तांत्रिक सत्र घेऊन स्पर्धेतील खेळाडूंना नियमावली समजावली. राष्ट्रगिताने उद्घाटन सत्राची सांगता झाली.


Related news:
Un mes de emoción ajedrecística en India

@ 28/11/2025 by WIM Angela Franco (es)
राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतून घडणार पुढचे दिव्या, गुकेश - ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे

@ 04/08/2025 by Vivek Sohani (mr)
एल.बी.एच. एम. बुद्धिबळ महोत्सव - खुली बुद्धिबळ स्पर्धा २०२५

@ 05/06/2025 by Vivek Sohani (mr)
फिडे महिला ग्रँड प्रिक्स पुणे - वैशालीचा पहिला विजय; झु जायनरची बरोबरीत सुटका

@ 19/04/2025 by Vivek Sohani (mr)
तिसरा महाराष्ट्र बुद्धिबळ महोत्सव २०२५: बुद्धिबळ प्रेमींसाठी एक भव्य सोहळा

@ 13/03/2025 by Vivek Sohani (mr)
3rd Maharashtra Chess Festival 2025: A Grand Celebration of Chess

@ 13/03/2025 by Vivek Sohani (en)
विदित और रौनक नें जीता महाराष्ट्र चैस चैलेंज मैच

@ 06/06/2023 by Niklesh Jain (hi)
महाराष्ट्र ग्रांड मास्टर चैलेंज - विदित और रौनक नें क्लासिकल में मारी बाजी

@ 05/06/2023 by Niklesh Jain (hi)

Contact Us